ठाणे :याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रितिक उर्फ अजय उर्फ अज्जू चौहाण (वय, २३, रा. फार्व्हड लाईन, उल्हासनगर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर निरंजन सूरज यादव (वय ४०, रा. खेमानी , उल्हासनगर ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
धक्का लागल्यावरून वाद: मृतक निरंजन यादव हा मूळचा उत्तरप्रदेश मधील कोशिंबी जिल्ह्यातील सिंगपूर गावातील रहाणारा होता. त्याला पत्नी आणि २ मुले असून कुटूंबाच्या उदरर्निवाहसाठी उल्हासनगर मधील खेमानी भागातील एका तबेल्याजवळ एका खोलीत एकटाच रहात होता. त्यातच मृतक निरंजन हा कॅम्प नंबर ३ च्या फार्व्हड लाईन चौक भागातील पप्पू किराणा स्टोअर्स समोरून (आज) २ मार्च रोजी पहाटे सव्वा वाजल्याच्या सुमारास पायी चालत जात होता. त्याच सुमाराला मृत निरंजनचा धक्का आरोपी अजय उर्फ अज्जू चौहाण याला लागला. मात्र केवळ चालताना धक्का लागल्याचा राग येऊन आरोपी अजयने पादचाऱ्याला मारहाण केली. यानंतर तो घटनास्थळावून फरार झाला होता. मारहाणीत निरंजनचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीला अटक: या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पथकाला मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात येऊन येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतकाची ओळख पटलेली नसतानाही पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अजय उर्फ अज्जू चौहाण याला आज पहाटे काही तासातच ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. आरोपी अजय हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.