ठाणे : भरधाव कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तीकडून भर रस्त्यात एका पादचाऱ्याच्या तोंडावर ॲसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशील मुननकर (३८, रा. उत्कर्ष नगर, भांडूप पश्चिम) असे ॲसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.
कारमधून ॲसिड हल्ला :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रसिका बांदिवडेकर ही आपल्या आई, आजीसोबत कल्याण पूर्वमध्ये राहतात. रसिका घाटकोपर परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तर रसिकाचा मामा जखमी सुशील मुननकर हे मीरा भाईंदर येथे नोकरी करत आहेत. गेल्या आठवड्यात जखमी सुशील हे रसिका यांच्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत. त्यातच रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुशील हे कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथून आपल्या भाचीच्या घरी पायी चालले होते. त्याच सुमाराला नेतिवली नाका परिसरात असलेल्या ओमा रुग्णालय जवळून जात असतानाच, समोरुन एक पांढऱ्या रंगाची भरधाव कार आली. कारमधील अज्ञात व्यक्तीने धावत्या कार मधून सुशील यांच्या चेहऱ्यावर जोरदार स्प्रे फवारणी केली. ती चुकविण्यासाठी सुशील खाली वाकले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर फवाऱ्यातील ॲसिड उडाले होते.
फक्त ताप, थंडीसाठीच रुग्णालये आहेत का:जखमी सुशीलला नातेवाईकांनी तात्काळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याण मधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करुन डाॅक्टरांनी त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र कळवा रुग्णालयातील डाॅक्टरांनी सुशील गंभीररीत्या भाजल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र रुग्णालयांमधून मिळणाऱ्या सल्ला आणि वागणुकीमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी सुशील यांना आपल्या राहत्या घरी आणले. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशा रुग्णांवर उपचार होत नसतील तर मग फक्त ताप, थंडीसाठीच ही रुग्णालये आहेत का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
आरोपींचा शोध सुरू : जखमी सुशील यांची भाची रसिका बांदिवडेकर (रा. नेतिवली, कल्याण पूर्व) यांच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात ॲसिड फेकणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
हेही वाचा: Mumbai Crime 14 वर्षीय मुलीवर केले वारंवार अत्याचार गर्ल्स हॉस्टेलच्या पादरीला अटक