ठाणे - बदलापूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. सोनिवली येथील विलगीकरण केंद्रातील रुग्णांनी उपचार व सुविधा मिळत नसल्याने गोंधळ घातला. तर काही रुग्ण केंद्रातील कक्ष सोडून रस्त्यावर आले. सोनिवली विलगीकरण केंद्र सुविधा
बदलापूर नगरपरिषदेच्यावतीने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोनिवली येथे विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, या विलगीकरण केंद्रात रुग्णांना वेळेवर उपचार व अन्य सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप करत रुग्णांनी गोंधळ घातला.
वेळेवर जेवण व गरम पाणी मिळत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे. मात्र ,काही रुग्ण बेशिस्त वागत असल्याने इतर रुग्णांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागतो आहे. विलगीकरण केंद्रातील असुविधेबाबत वारंवार तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याने रुग्णांनी कक्षाबाहेर येत कर्मचाऱ्यांना जाब विचारला. हा सगळा प्रकार त्याच ठिकाणच्या एका रुग्णाने मोबाईलमध्ये चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
गोंधळ घालून रुग्ण रस्त्यावर विलगीकरण केंद्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना बोलाविण्यात आले. त्यामुळे काही वेळाने परिस्थिती निवळली. मात्र, या घटनेनंतर बदलापूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेवर उपचार करावेत, अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे. चार दिवसापूर्वी एका रुग्णाने औषध वेळेवर घेतले. मात्र त्याला वेळेवर जेवण दिले नसल्याने त्याचा मृत्यू विलगीकरण केंद्रात झाल्याचा आरोप काही रुग्णांनी केला आहे.