ठाणे -मुंबईपासून केवळ ८९ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरबाड तालुक्यातील साखरे सराईवाडी गावात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही रस्ता नाही. त्यामुळे जंगल, रानावनातून अंधारातच चिखल तुडवत, नाले ओलांडत प्रवास करत या गावातील नागरिकांना मुख्य रस्त्यावर यावे लागते. विशेष म्हणजे, मुरबाडपासून साखरे सराईवाडी गाव २२ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर ते तगायत गावात ये - जा करण्यासाठी रस्ता नसल्याने रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना बांबूला कपड्याची झोळी करून नेत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात रुग्ण घेऊन जात असतानाच रस्त्यातच रुग्ण दगावलेल्या अनेक घटना घडल्या असून, त्याच घटनांची पुनरावृत्ती आज पुन्हा समोर आली आहे.
ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा अश्म युगातील जगणं आजही आदिवासीच्या नशिबी -
हेही वाचा -संजय राऊत कुणाला म्हणाले "दो कौडी के लोग"? ट्विटमधून कुणावर निशाणा?
जिल्ह्यातील पाड्यात रस्ताच नसल्याने पाड्याकडे कुणी फिरकत नाही, शाळेत जाणारी मुलं शाळा सुरू असताना पावसाळ्याचे चार महिने शिक्षणापासून वंचित राहतात. परिणामी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जातात. तर मुरबाड तालुक्यातील साखरे - सराईवाडी गावातील ५२७ लोकसंख्या असून १२१ कुटुंब या गावात पिढ्यांपिढ्या वास्तव करीत आहे. याच गावातील नवसु धाकु सराई वयोवृद्ध आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे कुटूंब व इतर नातेवाईक एका बांबूला कपड्याची झोळी करून त्या झोळीतून रुग्णालयात नेत होते. मात्र रस्ता नसल्याने रानवाटेने जात असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या गावाला रस्ता नसल्याअभावी वाहन जात नाही. त्यातच आजच्या कंमप्युटर युगातही आजारी रुग्णांना झोळीच्या साह्याने रुग्णालयात नेले जात आहे. त्यामुळे अश्म युगात आल्या सारखेच वाटत असल्याचे येथील तरुणांनी म्हटले आहे. या गावाला वर्षोनुवर्षे रस्ता, पाणी या समस्या भेडसावत आहेत.
रुग्ण दगावल्याची तिसरी घटना -
देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याचे मुख्यालय असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बहुतांश गाव - पाड्यात आदिवासींच्या नशिबी आलेले हे वेदनादायक जगणे खरच व्यथित करणारे आहे. ही अवस्था जिल्ह्यात अनेक पाड्यांमध्ये आहे. गावांचा विकास झाला, कार्यसम्राट, विकासपुरुष नेते गावांमध्ये पोहचले. मात्र या अशा १०० ते १२५ मतदार असलेल्या आदिवासी बांधवांच्या गावकुसाबाहेरील वाडी पाड्यात जाण्याचा रस्ता त्यांना सापडत नाही. म्हणून विकास झाला तो फक्त तालुक्याच्या लगत असलेल्या गावांचा, साखरे सराईवाडी गावात रस्ता होण्याबाबत जबाबदार स्थानिक प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून यापुढे एकही रुग्ण रस्त्याअभावी दगावणार नाही. यावर ठोस उपाययोजना करून गावातील रस्ता तयार करून तो मुख्य रस्त्याला जोडावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा -विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर; शिवसेना रामदास कदमांचे तिकीट कापणार?