ठाणे -येथील भिवंडी तालुक्यातील कल्याण-भिवंडी रोडवर असलेल्या कोनगाव येथील वेद हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उपचारात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून नातेवाईकांनी डॉक्टरांसह सफाई कामगार, सुरक्षारक्षक अशा ६ जणांना बेदम मारहाण केले. तसेच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात तोडफोडही केली आहे. लिलाबाई रामभाऊ वाडकर (६८) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; रुग्णालयाची तोडफोड करत नातेवाईकांची डॉक्टरसह नर्सला मारहाण - ठाण्यात रुग्णालयाची तोडफोड
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने उपचारात डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून नातेवाईकांनी डॉक्टरांसह सफाई कामगार सुरक्षा रक्षक अशा ६ जणांना बेदम मारहाण केली. तर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाची तोडफोडही केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील डोळखांब येथे राहणारी वयोवृद्ध महिला लिलाबाई यांना डेंग्यूचा आजार झाला होता. त्यांना प्रथम उपचारासाठी कल्याणच्या गुरुकृपा रुगणालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी आवश्यकता होती. परंतू गुरुकृपा रुगणालयातील अतिदक्षता विभागात खाट शिल्लक नसल्याने त्यांना तातडीने कोनगाव येथील वेद रुगणालयामध्ये हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान लिलाबाई यांचा अचानक मृत्यू झाला. हा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणाने झाल्याचा आरोप लिलाबाईच्या नातेवाईकांनी केला. तसेच रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टर संदीप रमेश राव, नर्स शैलम राजपुरे, ज्योती डिसूझा, नीतू देवराज, सुरक्षारक्षक सचिन सावंत, सफाई कामगार विद्या, अशा ६ जणांना त्यांनी बेदम मारहाण केली.
सदर मारहाणीत नर्स नीतू देवराज यांच्या डाव्या हाताच्या खांद्याला घातक व टणक शस्त्राने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली आहे. या मारहाण व तोडफोडप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात दोघा नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एपीआय के. जी. ढोके करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी वेद रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉक्टर गिरीश केणी यांनी मात्र मृतक महिलेच्या नातेवाईकांचा आरोप फेटाळून लावला आहे.