नवी मुंबई - पनवेल शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पेठगाव आणि पनवेल येथील चाळीमध्ये छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी तीन व्यक्ती दोन खोल्यांमध्ये घरगुती गॅस शेगडीवर गावठी हातभट्टीची दारू तयार करताना आढळून आले. त्यापैकी एक पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, तर इतर दोन व्यक्तींना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घरगुती गॅसवर गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या दोघांना अटक
पनवेल शहर पोलिसांनी गावठी दारू तयार करणाऱ्यांना अटक केली असून १७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे, तर एकजण फरार आहे.
दोन्ही खोल्यात मिळून ३०० लिटर दारू काढण्याचे रसायन, 7 लिटर तयार हातभट्टीची दारू, दोन गॅस सिलिंडर, दोन शेगड्या, 2 चाटू, असा 17 हजार 300 रुपयांच्या वस्तू मिळून आल्या. मुद्देमाल ताब्यात घेऊन गावठी दारू जागीच नष्ट करण्यात आली. याप्रकरणी अनंत बाळकृष्ण सुरते (57) व छोटू राठोड (38) या दोघांना ताब्यात घेतले असून, दोन्ही आरोपी पेठगाव, तालुका पनवेल येथील रहिवासी आहेत. तसेच पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू असून, तिन्ही आरोपीविरूद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.