पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतामध्ये, कांदे-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान नाही झाले - केंद्रीय मंत्री कपिल पाटील - Union Minister & BJP leader Kapil Patil
गेल्या अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरबाबत देशाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कदाचित 2024 पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मिर भारतामध्ये येईल (Pakistan-occupied Kashmir soon in India) अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही. कारण या सगळ्या गोष्टी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असे विधान केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Union Minister & BJP leader Kapil Patil ) यांनी केले आहे.
![पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतामध्ये, कांदे-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदी पंतप्रधान नाही झाले - केंद्रीय मंत्री कपिल पाटील](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14327319-227-14327319-1643605928346.jpg)
ठाणे:कल्याणात सुभेदार वाडा कट्ट्यातर्फे आयोजित रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना कपिल पाटील म्हणाले काश्मिरमधील 370 आणि 35 ए कलम हटवल्यानंतर विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही.नरसिंह राव यांचे उदाहरण दिले होते. तसेच नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी पार्लमेंटचे संयुक्त अधिवेशन घेत कायदा पारित करून घेतला. ज्यामध्ये असे नमूद केले होते की काश्मिर ही देशाची फार मोठी समस्या आहे. पाकव्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात असून हा भाग भारताने घेतल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. त्याचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना उत्तर दिले की हे तुमचेच काम आहे, तुमच्याकडून झाले नाही म्हणून आम्ही करतोय अशी आठवणही त्यांनी सांगितली.