ठाणे - 'बर्ड फ्ल्यू'ने देशासह राज्यातही मोठ्या प्रमाणात विविध शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याच्या घटना समोर येत आहेत. आता त्यात भर पडली ती कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी आणि कल्याण तालुक्यातील रायत्या गावाची. या दोन्ही ठिकाणी मृत पावलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पशुसंवर्धनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली असून पुढील खबरदारीच्या उपाययोजना विभागाकडून केल्या जात आहेत.
गेल्या आठवड्याभरात कल्याण-डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी कावळे, कबुतरे, कोंबड्या, 2 बगळे आदी 7 - 8 पक्षी मृतावस्थेत आढळून आले होते. या सर्व मृत पक्ष्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागातर्फे पुण्यातील पशुवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. त्यातील 2 पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. नरेश बांगर यांनी दिली आहे. तर, कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी गावातील एका घरात काही पाळीव कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. रायते गावात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममध्येही ब्रॉयलर कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर या दोन्ही ठिकाणांच्या मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातील पशुवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल नुकतेच पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून पशुसंवर्धन विभागानेही तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
हेही वाचा -कचरा संकलनाचे वादग्रस्त कंत्राट; मनपाच्या आमसभेत पप्पू देशमुख-राहुल पावडे यांच्यात खडाजंगी