महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंगरुम बाहेर जादू-टोण्याचा संशय; काँग्रेस उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा गोंधळ

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉंग रुमच्या बाहेर एका कारमध्ये काही व्यक्ती होमहवन करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर काँग्रेस उमेदवारासह कार्यकत्यांनी जादू टोण्याचा संशय घेत गोंधळ घातला.

By

Published : May 7, 2019, 12:14 PM IST

ठाणे

ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम यंत्रे ठेवलेल्या स्ट्रॉंग रुमच्या बाहेर एका कारमध्ये काही व्यक्ती होमहवन करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर काँग्रेस उमेदवारासह कार्यकत्यांनी जादू टोण्याचा संशय घेत गोंधळ घातला. त्या कार मालकांना अडवीत घडलेल्या प्रकारचा जाब विचारला असता, त्यांनी उडवा-उडावीची उत्तरे दिल्याने काँग्रेस कार्यकत्यांचा संशय अधिकच बळावला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करीत या प्रकरणावर पडदा पाडला.

ठाणे

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पडले. त्यानंतर सहाही विधानसभा क्षेत्रातील ईव्हीएम यंत्रे मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील एलकुंदे येथील प्रेसिडेन्सी स्कूल या ठिकाणी बनविण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुममध्ये ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस, राज्य राखीव पोलीस, स्थानिक पोलीस अशी तीन स्तरावरील सुरक्षा यंत्रणेचा जागता पहारा ठेवण्यात आला आहे. त्यातच सीसीटीव्हीवर नजर ठेवण्यासाठी काँग्रेस उमेदवारांनीही आपले कार्यकर्ते पहारेकरी म्हणून या ठिकाणी नेमले आहेत. तर याच शाळेच्या प्रवेश द्वारावर असलेल्या दुसऱ्या इमारतीमध्ये शाळा व्यवस्थापनाचे कार्यालय असून त्या ठिकाणी जाण्यास कोणासही मज्जाव नसल्याने त्या ठिकाणी ये-जा सुरु आहे.

या शाळेचे व्यवस्थापक महावीर जैन यांना भेटण्यासाठी काल सायंकाळी श्रीकांत पंदिरे व त्यांचे दोन साथीदार आले होते. चर्चा झाल्यांनतर प्रवेश दारापासून काही अंतरावर उभ्या इनोव्हा कार (एमएच ०४ ईएफ २३१५) मध्ये बसून होमहवनास सुरुवात केली. याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्थानिक युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांची कार अडवून कारची तपासणी केली. त्यावेळी कारच्या मागील बाजूस होमहवन सामुग्री आढळून आल्याने तेथील पोलिसांना बोलावून गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे हे सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्यांनी तुम्हाला होमहवन करण्यासाठी हीच जागा मिळाली का? असा प्रश्न करीत त्यांना खडसावले. तर कार मालक श्रीकांत पंदिरे यांनी आपण गोदाम खरेदीच्या चर्चेसाठी महावीर जैन यांच्याकडे आलो होतो. मात्र, माघारी जाताना सूर्यास्त झाल्याने कारमध्येच होमहवन केले. त्यामागे कोणताही दुसरा हेतू नसल्याचे सांगत त्यांनी विनवणी केली. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करीत त्यांना सोडून दिले.

दरम्यान, ज्या शाळेत ईव्हीएम यंत्र ठेवलेल्यास्ट्रॉंगरूम आहेत. त्या शाळेच्या आवारातील संपूर्ण परिसर निवडणूक यंत्रणेने ताब्यात घेतला आहे. मात्र, असे असताना शाळेच्या इमारतीसाठी वेगळा न्याय का? असा सवाल काँग्रेस कार्यकत्यांनी उपस्थित करीत, ज्यांना हरण्याची भीती असते, तेच अशा प्रकाराचे होमहवन करून जादूटोण्याचा आधार घेत असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनीही संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे गरजेचे असून शाळेच्या कार्यालयात बसून आपले व्यावसायिक व्यवहार करणाऱ्या शाळा व्यवस्थापकासह इमारतीमध्ये इतरही व्यक्तींना प्रवेश करण्यास पायबंद घातला पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details