ठाणे:ठाणे महानगरपालिका व ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व पारितोषिक वितरण' सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (रविवारी) उपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांचे आभार मानत अन्य राज्यातून आलेल्या छायाचित्रकारांचे आभार मानले. महाराष्ट्र सर्वांना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे. इथे सगळ्यांना संधी मिळते. कुठलाही जाती, धर्मभेद पाळला जात नाही असे सांगत उपस्थित सर्व छायाचित्रकार, पत्रकारांना जागतिक छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
छायाचित्रण कलेवर काय म्हणाले मुख्यमंत्री?छायाचित्रण ही कला नक्कीच सोपी नाही. यासाठी वेगळी दृष्टी लागते, प्रचंड मेहनत घ्यावी लागते. या मेहनतीला न्याय देण्याचे काम हे शासन नक्कीच करेल. पारंपरिक गोष्टींना आता आधुनिकतेची जोड देणे, ही काळाची गरज आहे. हे शासन पायाभूत सुविधा प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभे करीत आहे. विकासाला प्राधान्य देत आहे; मात्र हे करीत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याचीही कटाक्षाने काळजी घेतली जात आहे. ठाणे शहराचाही सर्वांगीण कायापालट होत आहे. लवकरच येत्या काळात आपणा सर्वांना स्वच्छ, सुंदर, विकसित ठाणे शहर आणि जिल्हा पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले. तसेच स्मार्टसिटीचे मोठे चित्र कॅमेऱ्यात सामावून छायाचित्र काढणारे मनोज सिंग यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.