नवी मुंबई - महानगरपालिका निवडणूक जवळ येत असतानाच शिवसेनेचे नेते व महानगरपालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक येत्या एप्रिल महिन्यात आहे. महापालिका विरोधी पक्षनेते व महाराष्ट्र वडार संघटनेचे अध्यक्ष विजय चौगुले यांना 50 लाख रुपयांची खंडणी न दिल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबातील लोकांना जीवे मारण्याची अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. तसेच विजय चौगुले यांचे काही महिलांसोबत आक्षेपार्ह फोटो असून 50 लाख रुपये न दिल्यास ते फोटोही समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली आहे. मात्र, विजय चौगुले यांनी कोणत्याही महिलेसोबत आक्षेपार्ह फोटो असल्याचे नाकारले आहे. तसेच संबंधित प्रकार हा राजकीय विरोधकांच्या माध्यमातून होत असल्याचे म्हटले आहे. या घटनेसंदर्भात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.