ठाणे - भक्ष्याच्या शोधात येणाऱ्या स्थलांतरित दुर्मिळ पक्षांचे थवेच्या थवे ठाणे खाडीत पाहावयास मिळतात. त्यातल्या त्यात फ्लेमिंगो या गुलाबी पक्षांचा रुबाब काही औरच असतो. केवळ हिवाळ्यातच खाडीची सैर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांनी सर्व ऋतूत खाडीत मुक्काम ठोकल्याने खाडी पात्र गुलाबी झाल्याचे दिसते. यामुळे, फ्लेमिंगोसह नानाविध दुर्मिळ पक्षांचे दर्शन करण्याची संधी पर्यावरणप्रेमींना अनुभवता येत आहे. ऐरोली येथील खाडीलगतच्या केंद्रावरून निघणाऱ्या बोट सफारीने थेट खाडीपरिसरात नौकानयनासह पक्षी निरीक्षणाची पर्वणी लाभली आहे.
ठाणे खाडीत विविध जैविक तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती विपूल प्रमाणात आहे. ठाण्यापासून ते विक्रोळी, मानखुर्दपर्यंत खाडीपात्र पसरले असून याठिकाणी गुजरात्या कच्छच्या रणातून आलेल्या फ्लेमिंगो पक्षांचा वावर वाढत आहे. केवळ हिवाळ्यातच खाडीची सैर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांनी सर्व ऋतूत खाडीत मुक्काम ठोकल्याने खाडी पात्र गुलाबी रंगाने उधळून निघालेली दिसते. त्यामुळे 2015 मध्ये ठाणे खाडीला फ्लेमिंगो पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून मान्यता देण्यात आली आहे.