ठाणे- शाळा सुरू करण्याबाबत टॉस्क फोर्स, शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच शाळा सुरू करण्यावर सरकारचे एकमत होत नसल्याने पालकांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. गुरुवारी ते ठाण्यातील कोपरी पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळेस ते बोलत होते.
कोपरी पुलाच्या त्रुटी दूर होतील-
कोपरी पुलाचे काम आमचे सरकार आल्यानंतर सुरू झाले. ठाणेकरांची मागणी लक्षात घेऊन हे काम आता पूर्ण होत आहे. याबाबत ज्या काही तक्रारी आल्या होत्या त्या दूर झालेल्या आहेत, तरीसुद्धा यातील आणखीन काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील आणि हा पूल ठाणेकरांसाठी भविष्यात निश्चितच लाभदायक ठरेल त्यांनी सांगितले. लवकरच या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल, असेही त्यांनी सांगितले.
शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती-
कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र तरी लहान मुलांना लस उपलब्ध नसल्याने राज्यातील शाळा सुरू करण्यास संमती देऊ नये, असे मत टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मांडले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुधारित व विस्तृत अध्यादेश तात्काळ काढावेत, असे निर्देश यावेळी दिले. दरम्यान, 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. टास्क फोर्सने याला विरोध दर्शवल्याने तूर्तास शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडणार आहे.