पालघर (वाडा) - जिल्हा कुपोषण मुक्त करणे हा शासन आणि समाजाचा एकत्रित विषय आहे. त्यामुळे सर्वांनी प्रयत्न केल्यास या समस्येवर निश्चित मात करता येईल, असा विश्वास पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या बाल संजीवन छावणीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी जव्हार येथे झाले. यावेळी चव्हाण बोलत होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यात शासनाने सुरू केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. सर्वांनी एकत्र येऊन असेच काम सुरू राहिल्यास कुपोषण लवकरच संपेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आदिवासी भागात आयुर्वेदिक औषधे असतात. त्यामुळे या भागात आयुर्वेदिक एमआयडीसी सुरू करता येऊन रोजगारही वाढेल, असे त्यांनी सुचविले. बाल संजीवन छावणीच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे कौतुक त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमामध्ये आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, ट्रस्टचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार पास्कल धनारे, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे आदी यावेळी उपस्थित होते.