नवी मुंबई - अवकाळी पावसाचा फटका हा कांदा आणि पालेभाज्यांना बसला आहे. बाजारात प्रतिकिलो शंभरीपेक्षा अधिक दर गाठलेल्या कांद्याने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याबरोबर पालेभाज्या, डाळी आणि मांसाहार देखील महाग झाला आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणी कांदा वापरताना हात आखडता घेत आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्या व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे घाऊक बाजारात कांद्याचा तुटवडा असून दरही गगनाला भिडले आहेत. रोजच्या आहारातील या गोष्टी महाग झाल्याने आहारात बटाटे आणि कडधान्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कांदे व पालेभाज्या एकीकडे कडाडल्या आहेत, तर दुसरीकडे डाळीही महाग झाल्या आहेत. त्याचा फटकाही गृहिणींना बसत आहे. गृहिणींचा महिन्याचा खर्च दुपटीने वाढला आहे. मुळात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पालेभाज्या स्वस्त होतात. मात्र, यावेळी वेगळेच चित्र पाहायला मिळत असल्याने गृहिणी चिंतेत आहेत.