ठाणे- "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणी प्रमाणे एक चिमुरडा वाचल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्याच्या तळाशी जावूनही या चिमुरड्याला नागरिक व डॉक्टरांच्या तत्परतेने जीवनदान मिळाले आहे. ही घटना अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे नव्याने सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी घडली आहे.
निखित बंसल असे (वय.१) असे चिमुरड्याचे नाव आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे नव्याने बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी चिमुरड्याचे आई-वडील मजुरीचे काम करतात. सध्या या बांधकामासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. अश्याच एका खोदलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात खेळता खेळता निखित पडला होता. निखित पाण्यात पडल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्वरित त्याला खड्ड्यातील साचलेल्या पाण्याबाहेर काढत लगतच असलेल्या डॉ.बी.जी. छाया उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.