ठाणे : जिल्ह्यात आगीचे सत्र सुरु असून काल रात्रीच्या सुमारास भिवंडीत केमिकल ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागून संपूर्ण ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडली. तसेच कल्याण शीळ मार्गावरील दिवा गावात टोरंट कंपनीच्या विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन एक जण ठार झाला, तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
विद्युत रोहित्राचा स्फोट :विशेष म्हणजे विद्युत रोहित्राचा स्फोट झाला. त्यावेळची स्फोटची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तर, रोहित्राचा स्फोट होऊन भूमिगत विद्युत वाहिन्यांना काही क्षणातच आग लागल्याने मोठं मोठ्या आगीच्या ज्वाला बाहेर येत होत्या, तर या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला १० ते १२ तास अथक परिश्रम करावे लागले. दुसरीकडे ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी भारत पेट्रोलियमची भूमिगत पाईप लाईनला आगीची झळ लागल्याचे बोलले जात आहे. या आगीत विशाल सिंह (३५) याचा होरपळून मृत्यू झाला. तर आणखी २ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
केमिकल ड्रमने भरलेल्या ट्रकला आग : भिवंडी तालुक्यातील दापोडे ग्रामपंचायत हद्दीत केमिकल ड्रमने भरलेल्या एका ट्रकमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. आग लागल्याचे समजतात चालकाने ट्रकमधून उडी मारल्याने त्याचा जीव बचावला. मात्र, काही क्षणातच ही आग इतकी मोठी आणि भीषण झाली की यामध्ये केमिकल ड्रमचे मोठमोठे स्फोट होऊन भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे स्फोटामुळे ट्रकमधून हवेत उडणारे ड्रम परिसरात कोसळत होते. हे ड्रम एका चायनीजच्या दुकानात येऊन पडल्याने दुकानाचेही नुकसान झाले आहे.