ठाणे - जिल्ह्यात रोज वाढते कोरोनाचे रुग्ण हे प्रशासनाच्या डोक्याला ताप ठरत आहेत. तर, दुसरीकडे ठाणेकरांचा सुरक्षेसाठी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलालाही कोरोनाने विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 685 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
ठाणेकरांसोबत पोलिसांनाही कोरोनाचा विळखा, आतापर्यंत 5 पोलिसांचा मृत्यू
ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह ठाणे शहर पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा पाचवा मृत्यू ठरला आहे. तर, आतापर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 685 अधिकारी आणि कर्मचारी हे कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाल्याची माहती आहे.
ठाण्यात रोज चारशेच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. राज्य सरकारनेही याची दखल घेत रुग्णांना आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न आणि सुखसुविधा उभारा अशा सूचना केल्या आहेत. परंतु, ठाणेकरांसोबतच ठाणे पोलीसदेखील कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची गंभीर बाब समोर येत आहे. आतापर्यंत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 685 अधिकारी आणि कर्मचारी हे कर्तव्य बजावताना कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. हे सर्व रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी आतापर्यंत 52 पोलीस अधिकारी आणि 437 कर्मचारी हे कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. तर, कोरोनाच्या विळख्यात ठाणे पोलीस मुख्यालयातील पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक यांचाही बधितांमध्ये समावेश असल्याची माहिती आहे.
ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह ठाणे शहर पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा पाचवा मृत्यू ठरला आहे. पोलीस हे आघाडीवर राहून कोरोनाला रोखण्यासाठी कार्यतत्पर आहेत. आज मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यास 1 जुलैरोजी पातलीपाडा, ठाणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 8 जुलै रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीसुद्धा चालू होती. मात्र, 9 जुलैरोजी दुपारी त्यांची कोरोनाशी असलेली झुंज संपली. त्यांचा दुपारी 3 च्या सुमारास मृत्यू झाला.