ठाणे:पोलिसांनी दोन्ही हत्येप्रकरणी आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. अरूण फर्डे आणि सोमनाथ जाधव असे सुरुवातीला अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गणेश खंडागळे, नारायण भोईर, जयेश फर्डे असे अटक केलेल्या सर्पमित्र असलेल्या आरोपींची नावे आहेत. रमेश मोरे ( रा. टिटवाळा) असे फरार असलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. गोपाळ रंगया नायडू (वय 62, रा. चक्की नाका कल्याण पूर्व) असे हत्या झालेल्या सेवानिवृत्त टि.सी.चे नाव आहे.
मृतदेह आढळला खड्डयात:ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी शहापूर तालुक्यातील शिवनेर फर्डेपाडा गावाच्या हद्दीत अटक आरोपी अरुण फर्डे यांच्या शेतात एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह खड्डयात पुरलेल्या स्थितीत मिळून आला होता. या घटनेची माहिती शहापूर पोलीस पथकाला मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर तहसील प्रशासन, शासकीय डॉक्टर आणि अधिकाऱ्याच्या उपस्थितीत शेतातील खड्ड्यात पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला. शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेहाची ओळख पटविण्याचा तपास सुरू केला.
अंगठीवरून पटली ओळख:ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी सदर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस पथके तयार केली. विशेष म्हणजे, मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मृतकाच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा केल्या होत्या. तर मृताच्या अंगात केवळ बनियान आणि अंडरवेअर होते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलीस पथकासमोर आव्हान होते. तपासादरम्यान मृतदेहाचा अहवाल आल्यानंतर टीसीची विषारी सर्पदंश करून त्यांचा शस्त्राने गळा चिरल्याचे समोर आले. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचे फोटो, वर्णन आणि नाव प्राप्त केली. त्यानंतर मृतदेहाच्या हातातील बोटात असलेल्या अंगठीवरून ओळख पटविली असता मृतक कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथे राहणारा गोपाळ रंगया नायडु असल्याचे निष्पन्न झाले.