ठाणे- शेतकऱ्याच्या अंगणातून बैल चोरुन तो बोलेरो जीपमधून घेऊन जाणाऱ्या कसायांच्या त्रिकुटाला जमावाने पकडून बेदम चोप दिल्याची घटना घडली. या मारहाणीत एका कसायाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची आहे. ही घटना भिवंडी - पारोळ रोडवरील खडकी ब्रिजवर घडली आहे.
नफीस कुरेशी (वय 28, रा. कसाईवाडा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या कसायाचे नाव आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात जमावावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, बैल चोरणाऱ्या कसायांच्या टोळीवरही गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - नवी मुंबई महापालिका निवडणूक २०२० : प्रभाग रचनेचे प्रारूप आणि आरक्षणाची सोडत जाहीर
याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडी तालुक्यातील भुईशेत येथील शेतकरी प्रकाश नवश्या डोंबरे यांच्या अंगणात बांधून ठेवलेला बैल मध्यरात्री चोरण्याचा प्रयत्न झाला. मृत नफीस कुरेशी, साथीदार आकिब जावेद आलम अंसारी( 20 रा. गुलजार नगर) व अमीर शकील खान (23 रा. ईदगाह रोड) यांनी हा बैल बोलेरो जीपमधून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासी पाड्यावरील नागरिकांना याची कुणकूण लागताच त्यांनी बोलेरो जीपचा पाठलाग करून खडकी पुलावर या तीनही कसायांना बेदम मारहाण केली.
या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तिघा कसायांच्या विरोधात तर नफीस अंसारी याच्या मृत्यू प्रकरणी जमावाच्या विरोधात खुनाचा गुन्हा असे 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
हेही वाचा -माघी गणेशोत्सवातील पुजेच्या जेवणातून १५ हून अधिक जणांना विषबाधा