ठाणे- पत्नी व मुलाला घेऊन सासरवाडीला निघालेल्या दुचाकीस्वाराला अज्ञात आयशर ट्रक चालकाने हुलकावणी दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार तर १० वर्षीय मुलगा व दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना भिवंडी तालुक्यातील खारेगांव ब्रिजवर घडली आहे. शर्मिला ईश्वर पुजारी ( ३४ रा. जूचंद्र, वाकीपाडा, ता. वसई ) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती ईश्वर व मुलगा दर्शन (१० वर्षे) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
हेही वाचा - कन्नड-चाळीसगाव घाटात कार 200 फूट दरीत कोसळली; एक ठार, एक गंभीर
मृतक शर्मिला या पती व मुलासोबत दुचाकीवरून सकाळच्या सुमारास कल्याण येथे माहेरी जात होत्या. त्यांची दुचाकी खारेगाव ब्रिजवर असताना पाठीमागून भरधाव वेगातील अज्ञात आयशर ट्रकने हुलकावणी दिली. त्यावेळी ईश्वर पुजारी हे दुचाकीसह रोडवर पडल्याने शर्मिला हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ईश्वर व मुलगा दर्शन हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहे.