ठाणे :ठाणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या आधीच तुटपुंजी आहे. मे महिन्याच्या अखेरीस, म्हणजे एकाच दिवशी ठाणे महापालिकेतील सुमारे 100 कर्मचारी, 11 वरिष्ठ अधिकारी निवृत्त होणार आहेत. याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होणार आहे. लवकर भरती प्रक्रिया राबविण्याचा मानस पालिका प्रशासनाने व्यक्त केला असून, राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एकीकडे गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेतील अधिकारी, अभियंते, अनेक कर्मचाऱ्यांची कुचंबणा होत असताना, मे महिन्यानंतर ठाणे महापालिका जम्बो रिटायरमेंटनंतर ठाणे महापालिका रिकामी होणार आहे.
कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया : सध्या ठाणे महापालिकेकडे वर्ग 1 - 176, वर्ग 2 - 155, वर्ग 3 - 2465, वर्ग 4 - 4010 असे मनुष्यबळ आहे. एकीकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, तर दुसरीकडे भरतीपासून प्रक्रिया राबविली जात नसल्याने व्यवस्थापन कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. ठाणे पालिकेतील गेल्या दोन वर्षांचा विचार केल्यास दर महिन्याला सरासरी ३० ते ९० कर्मचारी निवृत्त होत आहेत. या सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांमधील पोकळी भरून काढण्यासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, यामुळे पालिकेतील महत्त्वाच्या पदावरील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा प्रश्न सुटत नाही.