ठाणे - अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली व ठाणे परिसरातील इमारतींमधील लिफ्टचे नियंत्रण करणारा कंट्रोल ड्राईव्ह हा पार्ट अतिशय चलाखीने चोरी करणाऱ्या चोरट्याला उल्हासगनर गुन्हे शाखा घटक-४ च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
विशेष म्हणजे हा चोरटा पूर्वी लिफ्ट मेन्टनेसचे काम करीत असल्याने त्याला लिफ्टची परिपूर्ण माहिती असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ३९ लिफ्टचे चोरी केलेले ड्राईव्ह तसेच १ मोटरसायकल असा ७ लाख ८० हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. विकास तिवारी (२३) असे सराईत चोरट्याचे नाव आहे.
३९ ड्राईंव्हसह १७ लाख ८० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली व ठाणे परिसरातील ईमारतींमधील लिफ्टचे नियंत्रण करणारा कंट्रोल ड्राईव्ह या पार्टची चोरी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे लिफ्ट बंद पडून इमारतींमधील नागरिकांना विशेषता ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत होता. त्या ड्राईव्ह चोरी करणाऱया व्यक्तीचा शोध गुन्हे शाखा घटक-४ च्या पोलिसांनी सुरू केला होता. हा तपास करीत असताना लिफ्टचे कंट्रोल ड्राईव्ह चोरी करणारा व्यक्ती फॉरेस्ट नाका अंबरनाथ पश्चिम येथे येणार असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून विकास याला फॉरेस्ट नाका परिसरातून ताब्यात घेतले गेले.
त्याच्याजवळून इमारतीचे लिफ्ट ड्राईव्ह काढण्याच्या उपकरणासह एक चोरीची मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली व ठाणे परिसरातील अनेक लिफ्ट ड्राईव्ह चोरी केल्याची धक्कादायक माहिती दिली. त्याने आत्तापर्यंत जवळपास ३९ लिफ्ट ड्राईव्हची चोरी केली असून तो माल त्याने गिरी नावाच्या व्यक्तीला विकला असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गिरी यालादेखील ताब्यात घेतले असून विकास व गिरी या दोघांकडून ७ लाख ८० हजार रूपये किंमतीचे ३९ लिफटचे ड्राईव्ह हस्तगत करण्यात आले आहेत.
याशिवाय विकास तिवारी याने हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३० हजार रूपये किंमतीची मॅस्ट्रो मोटरसायकल चोरी केली होती. ती चोरीची मोटरसायकल तो लिफ्टचे ड्राईव्ह चोरी करण्यासाठी वापरत होता. पोलिसांनी बदलापूर पुर्व, पश्चिम, अंबरनाथ, डोंबिवली व कल्याण या ठिकाणी लिफ्ट ड्राईव्ह चोरीस गेल्याचे १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर एक मोटरसायकलचाही गुन्हा उघडकीस आला आहे. लिफ्टच्या ड्राईव्ह चोरी प्रकरणी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून आणखी काही लिफ्ट कंट्रोल ड्राईव्ह चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
पोलीस उपायुक्त दिपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, स.पो. श्रीकृष्ण नावले, पोसी, उप निरीक्षक गणेश तोरगल, पोलीस हवालदार संतोष माळी, सुनील जाधव, पोलीस नाईक जगदीश कुलकर्णी, नवनाथ वाघमारे, पोलीस शिपाई योगेश पारधी यांनी ही कारवाई केली आहे.