ठाणे- मुंब्रा टोलनाका येथे गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या इरशाद इकबाल इनामदार (वय ३५) याला मुंब्रा पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून ३९ किलो ७०० ग्राम वजनाचा व ५ लाख ९५ हजार ९३० रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
मुंब्र्यात ५ लाख ९५ हजाराचा गांजा हस्तगत, एकाला अटक - smuggling
इरशाद इकबाल इनामदार (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३९ किलो ७०० ग्राम वजनाचा व ५ लाख ९५ हजार ९३० रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. १४ ) गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे यांनी मुंब्रा बायपास रोड येथील बंद टोलनाक्याजवळील मोकळ्या मैदानात कौसा येथे सापळा रचला. रात्री १०. २० च्या सुमारास संशयित व्यक्ती इरशाद इनामदार (रा. सिद्धार्थ नगर, मु. पिसावली) याला अटक केली. त्याच्याजवळ झाडाझडतीत ५ लाख ९५ हजार ९३० रुपयांचा गांजा मिळून आला. मुंब्रा पोलिसांनी त्याच्या विरूद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी इरशाद याची सासू शेहनाज पठाण ही जालना जिल्ह्यात राहायला आहे. तिने इरशादला रेल्वे मधून गांजा आणून दिला. तसेच हा गांजा दक्षिणेकडील राज्यातून येत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. पोलीस आरोपी इरशादच्या सासूचा शोध घेत आहेत. त्याला बुधवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करीत आहेत.