ठाणे- शहापूरहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकीने महामार्गावरील दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील वाशिंद नजीक खातिवली गावाजवळ घडली.
मिलिंद मधुकर वेखंडे आणि सचिन सिताराम दळवी अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही कल्याण पश्चिमे कडील बेतुरकर पाडा परिसरात राहत होते, या अपघाताची नोंद वाशिंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
वाशिंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मिलिंद वेखंडे आणि सचिन दळवी हे दोघे मित्र गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शहापूरहून कल्याणच्या दिशेने येत होते. याच वेळी मुंबई-नाशिक महामार्गावरील खातिवली गावाजवळ दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात सचिन आणि मिलिंदचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाशिंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केल्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.