ठाणे : 19 तारखेला अंबरनाथ तालुक्यातील वसार गावाच्या निर्जन भागात एका वृद्धाचा खून झाला. याबाबत कोणताही पुरावा नसताना उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या टीमने या खूनाचा उलगडा केला आहे. लॉकडाऊनमध्ये घेतलेल्या उसनवारी पैशांच्या तगाद्यावरून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी विठ्ठल दुधेशिया या भाजीपाला विक्रेत्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
उसनवारीच्या पैशावरून झाला 'त्या' वृद्धाचा खून वसार गावाच्या लालचक्की येथे राहणारे शेजुमल रामनानी(वय 70) या वृद्धाचा तारेने गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद जगदेव, संपत फडोळ, उपनिरीक्षक गणेश तोरगल आदी टीमने वसारचा निर्जन परिसर पिंजून काढताना सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात 18 तारखेला सकाळी एक तरुण शेजुमल रामनानी यांना स्कुटरच्या मागे बसवून जात असल्याचे निदर्शनास आले. मात्र, एका तासाने तो स्कुटरवर एकटाच परत आला.
महेश तरडे यांच्या टीमने या तरुणाचा शोध घेतला. विठ्ठल दुधेशियाला पोलिसांनी ताब्यात घेताच त्याची बोबडी वळाली. आरोपी विठ्ठल दुधेशिया हा मूळ गुजरातचा असून तो उल्हासनगरमधील लालचक्कीत भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. मृत शेजुलम हे नेहमी त्याच्याकडून भाजीपाला घेत असत. तीन महिन्यापूर्वी लॉकडाऊन जाहीर झाल्याने व्यवसाय ठप्प पडला म्हणून आरोपी विठ्ठलने त्यांच्याकडून 5 हजार रुपये उसनवारीवर घेतले होते. ते परत घेण्यासाठी शेजुमल यांनी तगादा लावला होता. ते शिवीगाळ व दमदाटी करत असल्याने विठ्ठलने त्यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती विरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.
कोणताही पुरावा नसताना खूनाचा उलगडा करण्यात आला असून त्याचे श्रेय गुन्हे अन्वेषण टीममधील अधिकारी मनोहर पाटील, प्रमोद जगदेव, संपत फडोळ, गणेश तोरगल, उदय पालांडे, एस. के. पवार, रमजू सौदागर, सुनील जाधव, रामचंद्र जाधव, निसार तडवी, रमेश केंजळे, भटू पारधी, जगदीश कुलकर्णी, गणेश गावडे, चंद्रकांत पाटील, अशोक पाटील, दादासाहेब भोसले, नवनाथ कोयंडे यांना जात असल्याचे महेश तरडे यांनी सांगितले.