महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Woman Died In Bhiwandi: जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा सज्जा अंगावर कोसळून महिला ठार - old age woman died

भिवंडी शहरानजीक असलेल्या खाडीपार-खोणी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गौसिया मशिदीजवळील ४० ते ४५ वर्षे जीर्ण असलेल्या अब्दुला फक्की दुमजली इमारतीच्या स्लॅबचा सज्जा कोसळला. यामध्ये एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शहनाज जहीर अन्सारी (५५) असे इमारत दुर्घटनेत मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.

Woman Died In Bhiwandi
पादचारी महिला ठार

By

Published : Jul 14, 2023, 8:03 PM IST

ठाणे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शहनाज ही खाडीपार येथील रसुलाबादमधील डोंगरकर ट्रस्ट इमारतीच्या तळमजल्यावर कुटुंबासह राहत होती. ती कामानिमित्त (आज) शुक्रवार दुपारच्या सुमारास अब्दुला फक्की इमारतीच्या जवळून पायी चालत होती. त्यावेळी या जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा सज्जा अचानकपणे कोसळून शहनाज यांच्या अंगावर पडला. यामुळे त्या ढिगऱ्याखाली दबल्या गेल्या. ही दुर्घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी ढिगारा हटवत तिला ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. नागरिकांनी ३ भावांच्या मदतीने शहनाजला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे.

इमारतीचा वाद न्यायप्रविष्ट :या घटनेने ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. तहसील कार्यालयात जीर्ण इमारतींबाबत कोणतीही नोंद नाही. प्रशासनाने जीर्ण इमारतींचा सर्व्हे करून तहसील कार्यालयात स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे. तसेच या जीर्ण झालेल्या इमारतीला स्थानिक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी इमारत रिकामी करण्यासाठी नोटीस बजावली होती. तरी देखील ५ जण जीव मुठीत धरून वास्तव्य करीत असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. या इमारतीचा वाद न्यायप्रविष्ट असल्याचेही परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.

हलगर्जीपणा कारणीभूत :ग्रुप ग्रामपंचायत खाडीपार-खोणी प्रशासन, इमारत मालक अब्दुल फक्की आणि गौसिया मस्जिद ट्रस्ट आदींच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप मयत कुटुंबाच्या परिवारासह येथील नागरिकांनी केला आहे. तर या इमारत दुर्घटनेप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोऊनि ए.डी. सूर्यवंशी करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details