ठाणे -मुबंई - नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथील पुलाखाली ओला कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना एक ऑगष्ट रोजी उघडकीस आली होती. त्यानंतर पत्नीच्या फिर्यादीवरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असता खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरासोबत विवाह करण्यासाठी पती घटस्फोट देत नसल्याने त्या रागातून प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने कट रचून हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात पत्नी श्रुती प्रभाकर गंजी (वय 32 रा. कणेरी,) प्रियकर नितेश गोवर्धन वाला (वय, 28 रा.भादवड ) मैत्रीण प्रिया सुहास निकम 32 रा.वेताळपाडा) असे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे असून हत्या करणारे दोघे जण फरार असून त्यांचा तपास नारपोली पोलीस करत आहेत.
एक लाखाची सुपारी देऊन पतीची हत्या -
मृत प्रभाकर व पत्नी श्रुती या दोघांचेही अनैतिक वैवाहिक संबंध असून त्यातून पत्नी श्रुती हिने प्रियकर नितेश वाला याच्या सोबत विवाह करण्यासाठी आपल्या पतीकडे घटस्फोटासाठी तगादा लावला होता. मात्र पती प्रभाकर घटस्फोट देत नसल्याची माहिती तिने आपली मैत्रीण प्रिया निकम हिला दिली. तिचा सुध्दा घटस्फोट झाला असल्याने तिने पतीची हत्या करून काटा काढण्याचा सल्ला दिला. त्यासाठी आपल्या ओळखीचे दोन युवक असल्याचे सांगितले. त्यानंतर पत्नी श्रुती हिने स्वतः कडील दागिने गहाण ठेवून एक लाख रुपयांची सुपारी हत्या करणाऱ्या दोन जणांना दिली व त्यानंतर पत्नी श्रुती, प्रियकर नितेश व मैत्रिण प्रिया यांनी कट रचला. हत्या करणाऱ्यांनी 31 जुलैच्या रात्री मुंबई येथे जाण्यासाठी प्रभाकर यास मोबाईल करून रात्री दहा वाजता कार बुक केली. त्यानंतर प्रवासात मानकोली येथे त्या दोघा मारेकऱ्यांनी गळा आवळून त्याची हत्या केली व मृतदेह कारमध्येच ठेवून पसार झाले.
अटक आरोपींना पोलीस कोठडी तर दोन आरोपी अजूनही फरार -
या गुन्ह्याचा तपास नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा ठाणे हे एकत्रित करीत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात फिर्याद देणारी पत्नी श्रुती हीच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात पत्नी श्रुती ,प्रियकर नितेश मैत्रीण यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 13 ऑगष्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून हत्या करणारे दोघे जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे.