ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या विरोधात उल्हासनगरमध्ये आक्षेपार्ह घोषणाबाजी (Offensive sloganeering against CM Shinde) करण्यात आली आहे. उल्हासनगर शहरातील ठाकरे गटाने आयोजित केलेल्या मशाल रॅलीत (Thackeray group Mashal Rally Thane) हा प्रकार घडला असून मोर्चात ५० खोके, एकदम ओके, गद्दार, निंब का पत्ता कडवा है ... आदी घोषणा देण्यात आल्या. काही घोषणांवर विरोधकांनी आक्षेप नोंदविल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी आज ठाकरे गटाचे उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह ९ पदाधिकाऱ्यांवर १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
शिंदे - ठाकरे गटात मोठे वादविवाद होण्याची शक्यता -शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्या नंतर ठाकरे गटाला मिळालेले मशाल हे चिन्ह घराघरात पोहचवण्यासाठी या मशाल रॅलीचे आयोजन २३ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. जिजामाता उद्यानापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मशाल रॅली काढण्यात आली होती. या मशाल रॅलीत घोषणा देतांना कार्यकर्त्यांचा जिभेवरचा ताबा सुटला आणि त्यांनी या घोषणा दिल्या. या प्रकारामुळे शिंदे - ठाकरे गटात मोठे वादविवाद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.