ठाणे : MNS Toll Protest : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छोट्या चारचाकी गाड्यांना टोल माफी (Devendra Fadnavis on Toll Plaza) असल्याचा व्हिडिओ दाखवत वाहन चालकांना विना टोल जाऊ देत मनसैनिकांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, याला टोल प्रशासन आणि पोलिसांनी मज्जाव करत आक्रमक झालेल्या अविनाश जाधव (Avinash Jadhav Aggressive) यांच्यासह अकरा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळं ठाण्यात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अविनाश जाधव यांच्या आंदोलनानंतर टोल व्यवस्थापनानं चार चाकी वाहनांना मोफत सोडण्यास सुरुवात केली.
मनसे आक्रमक : टोल नाके बंद व्हावे यासाठी आता मनसेनं साम-दाम-दंड-भेद वापरण्याचा निर्धार केलाय. कधी गांधीगिरी करत, तर कधी आमरण उपोषणाचं हत्यार उपसत मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सरकारनं टोल प्रशासनावर दबाव आणण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु, तो उद्देश सफल झाला नाही. तब्बल चार दिवस उपोषण करत असलेल्या ठाणे, पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन उपोषण मागं घेण्यास सांगितलं. तसेच टोलविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश दिले. आपल्या नेत्याचा आदेश शिरसावंद्य मानत सोमवारी मनसे नेते अविनाश जाधव, शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी पुन्हा एकदा आनंदनगर येथील टोल नाक्यावर धडक दिली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोल संदर्भातील एक व्हिडिओ दाखवत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
फडणवीसांचा टोल माफीचा व्हिडिओ व्हायरल : तथाकथित व्हिडिओमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी लहान गाड्यांना टोल माफी असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं मनसैनिकांनी लहान चार चाकी वाहनांना टोल न भरता जाण्याचं आवाहन केलं. परंतु, बहुतांश गाड्यांवर फास्ट टॅग लावले असल्यामुळं त्यांचा टोल परस्पर भरला जात असल्याचं आढळून आलं. जर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे टोल माफीची घोषणा केली होती तर आतापर्यंत टोल का घेतला जात होता? ही लोकांची फसवणूक असून, यापुढे टोल भरणार नाही, अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली. यावेळी नवघर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. पोलीस आणि मनसे नेते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.