ठाणे : एनआरसी कंपनीच्या शेकडो कामगारांनी आज ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली कल्याणमधील कामगार कार्यालयासह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. एनआरसी कंपनीची जमीन २०१९ साली अदानी ग्रुपने खरेदी केली. या जमिनीवर प्रकल्प उभारण्याचे काम सुरु केले. कामगारांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचा दरवाजा ठोठावला आहे. 4 हजार कामगारांनी 1 हजार 300 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मागितली आहे.
हक्काच्या पैशासाठी कामगार लढा :एनआरसी कंपनीतील कामगार कंपनी बंद झाल्यानंतर मागील 14 वर्षे आपल्या हक्काच्या पैशासाठी कामगार लढा देत आहेत. मात्र, अद्याप कामगारांना थकीत देणी मिळालेली नाही. याबाबत ऑल इंडिया इंडस्ट्रीयल अॅण्ड जनरल वर्कर्स युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव उदय चौधरी हे सातत्याने कायदेशीर लढा देत आहे. 2009 साली टाळेबंदी झाली. विकासक आणि कंपनी प्रशासनाकडून कामगाराची फसवणूक करण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप चौधरी यांनी यापूर्वीच केला होता.
'या' मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा : यावेळी कामगारांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची संपूर्ण करवसूली एकशे नव्वद कोटी वसूल करूनच बांधकामाची परवानगी अदानी ग्रुपला द्यावी. महसूल विभागाची कोट्यावधीची कर वसूली व जिल्हाधिकार्यांनी आकारलेल्या दंडाची कोट्यवधीची रक्कम त्वरित वसूल करावी. प्रॉविडंट फंडाची रक्कम दंडासह अदानीकडून वसूल करा. तसेच कामगारांची थकबाकीची पूर्ण रक्कम कामगारांना मिळवून द्यावी, या मागण्यासाठी आज आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.