ठाणे - बदलापुरात पबजी खेळाडूंसाठी चक्क आरक्षित जागेचा फलक एका झाडावर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, एका वृद्ध नागरिकाला हा फलक खटकल्याने त्याने ट्विट्मार्फत थेट पोलीस आयुक्तांकडे याबाबतची तक्रार केली आहे.
बदलापुरात पबजी खेळाडूंसाठी आरक्षित जागेचा फलक; तक्रार दाखल - तक्रार
बदलापुरात पबजी खेळाडूंसाठी चक्क आरक्षित जागेचा फलक एका झाडावर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
पबजी गेममुळे अनेक मुलांना जीव गमवावे लागल्याने पबजी गेम वादग्रस्त ठरला. तरीही हा गेम खेळणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. यातच शहरातील कात्रप परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एका झाडाला पबजी खेळाडूंची आरक्षित जागा, असा फलक लावण्यात आला आहे. या फलकावर, ही जागा पबजी खेळाडूंसाठी राखीव आहे. ओन्ली पबजी फायटर्स हुकूमावरून, अशा सूचनाही यावर लिहिण्यात आल्या आहेत.
हा फलक पाहून अनेकांनी चांगल्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या. मात्र, एका वृद्ध नागरिकाला हा फलक खटकल्याने त्यांनी ट्विटच्या माध्यमातून थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे याबाबतची तक्रार केली. या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांनी बदलापूर पूर्व पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हा फलक झाडावरून काढून ताब्यात घेतला. मात्र, हा प्रकार खोडसाळपणा करण्यासाठी काही मुलांनी केला असावा, अशी चर्चा आता शहरात रंगली आहे.