ठाणे -ठाण्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी पावसाळा डिसेंबर महिन्यापर्यंत लांबल्याने ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा पाणीकपात करावी लागणार नसल्याची ( No water cut Thane ) माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ( Collector Rajesh Narvekar ) यांनी दिली.
अपुरे जलस्रोत, पाण्याची वाढती मागणी, वितरणव्यवस्था सदोष असल्याने गळती आणि चोरीमुळे ३५ टक्के पाणी वाया जायचे. त्यात भर म्हणजे शहरी भागाला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित असलेली काळू, शाई, पोशीर ही धरणे गेल्या दोन दशकांत मार्गी लागू शकली नाही. यामुळे गेली काही वर्षे ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये पाणीकपात करावी लागत होती.
पाऊस सर्वसाधारपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत पडत असल्याने ऑक्टोबर महिन्यापासून धरणातील पाणीसाठा वापरला जातो. मात्र, यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस लांबला. त्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. यंदा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेसा पाणीसाठा धरणात असल्याने कपात करावी लागणार नाही, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ( Collector Rajesh Narvekar ) यांनी स्पष्ट केले.