ठाणे -भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर ठाणे शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र, ठाण्यातील ३१७ रुग्णालयांपैकी २४१ रुग्णालयांनीच फायर ऑडीट करुन घेतले असून, अद्याप सुमारे ७६ रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिरोध यंत्रणाच कार्यान्वीत नसल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
भांडुप येथील सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोविड रुग्णालयांचे अग्निपरीक्षण तपासण्याचे आदेश दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा नवजात शिशुंचा होरपळून मृत्यू झाला होता. तेव्हाही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अग्निसुरक्षा व्यवस्था कार्यान्वीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य खात्याने अग्निशमन दलाकडे ठाणे शहरातील ३१७ रुग्णालयांची यादी दिली होती. या यादीनुसार अग्नीशमन दलाने सर्व रुग्णालयांना नोटीसा बजावून अग्निसुरक्षेचा आढावा घेतला होता.
७६ रुग्णालयांचा अहवाल बाकी
शासकीय आणि महापालिकेच्या ३४ रुग्णालयांची अग्नीसुरक्षाही तपासण्यात आली होती. या ३४ रुग्णालयांमध्ये अग्नीसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ३१७ खासगी रुग्णालयांपैकी केवळ २४१ रुग्णालयांनीच अग्नीसुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. मात्र, ७६ रुग्णालयांनी अद्याप आपला अहवालच सादर केला नसल्याची माहिती अग्नीशमन अधिकारी गिरीश झळके यांनी दिली आहे.
ठाण्यातील ७६ रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिरोध यंत्रणाच नाही ठाण्यात सुरू आहेत अनेक अवैध रुग्णालय
ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाला हड़ताळ फ़ासत अनेक रुग्णालय अवैधरित्या सुरु आहेत, राजकीय वरदहस्त असल्यामुळे ही रुग्णालय सुरू असल्याची चर्चा आहे. या रुग्णालयातून दररोज हजारो रुग्णांवर उपचार केला जातो. अशा रुग्णालयांमुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र तरीदेखील या रुग्णालयांवर अंकुश ठेवण्याची ज्या प्रशासनावर जबाबदारी आहे. ते या प्रकाराकडे डोळे झाक करत असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा -बाधितांची संख्या कमी न झाल्यास, लॉकडाऊन अटळ - पालकमंत्री छगन भुजबळ