ठाणे- वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने कल्याण तालुक्यातील खडवली नदीवर हजारो नागरिक थंडा थंडा कुल कुल होण्यासाठी धाव घेतात. मात्र, नदी पात्रात गेल्या काही महिन्यापासून घाणीचे साम्राज्य पसरून पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे नदी पात्रातील स्वच्छता करण्यासाठी निसर्ग स्वरक्षण समितीची तरुणाई सरसावली असून समितीच्या पुढाकाराने दर रविवारी नदी पात्रातील घाण काढून स्वच्छता व साफसफाईचे अभियान राबवले जात आहे.
कल्याण - कसारा रेल्वे मार्गावरील खडवली रेल्वे स्थानकानजीक असलेल्या खडवली नदीचे पाणी स्वच्छ आणि खळखळून वाहत असल्यामुळे या नदीवर वाढत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही कमी करण्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यातून हजारो पर्यटक येत असतात. मात्र, काही हुल्लडबाज पर्यटक नदी पात्रातच मद्यपान करून बाटल्या तिथेच फोडतात, तर काही पर्यटक दुपारच्या जेवणातील उरलेले खाद्यपदार्थही नदी पात्राजवळच टाकून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण करतात. काही स्थानिक गावकरी नदीमध्ये गाड्या आणि कपडे धुण्यासाठी नदीवर येतात. त्यामुळे नदीचा परिसर घाण होतो.