महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात चक्री पाळण्यातून पडल्यान नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू

ही घटना भिवंडीतील समदनगर बगीचा येथील आनंदमेळ्यात घडली आहे. या अपघाताच्या  घटनेनंतर चक्री पाळणा चालक पसार झाला आहे. रमजान सारख्या आनंदी सणाच्या दिवशीच मुस्कानच्या मृत्यूने कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे .

मयत मुस्कान मोहम्मद शमीम सिध्दीकी

By

Published : Jun 7, 2019, 12:55 PM IST

ठाणे - ईद निमित्त घरातील वडीलधाऱ्यांकडून मिळालेल्या ईदी रुपी बक्षिस रक्कमेतून आनंदमेळ्यातील चक्री पाळण्यात खेळण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलीचा चक्री पाळण्यातून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुस्कान मोहम्मद शमीम सिध्दीकी असे मृत मुलीचे नाव आहे.

मयत मुस्कान सिध्दीकी

ही घटना भिवंडीतील समदनगर बगीचा येथील आनंदमेळ्यात घडली आहे. या अपघाताच्या घटनेनंतर चक्री पाळणा चालक पसार झाला आहे. रमजान सारख्या आनंदी सणाच्या दिवशीच मुस्कानच्या मृत्यूने कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे .

भिवंडी शहरातील रामेश्वर मंदिर परीसरातील राहणारी मुस्कान ही नऊ वर्षांची मुलगी आपल्या चुलत बहिणींसोबत समदनगर बगीचा येथील आनंदमेळ्यात दुपारी एक वाजता गेली. तेथील हाताने फिरवल्या जाणा-या चक्री पाळण्यात ती बसली. त्यानंतर पाळणा वर गेला असता तीचा घाबरुन तोल गेला व ती खाली पडत असताना पाळण्यातील इतर दालनावर आदळून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. मात्र, चक्री पाळणाचालकाने तेथून पलायन केले.

या दुर्घटनेनंतर मुलांनी घरी येऊन मुस्कानच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली असता, त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुस्कानला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांनी तिला त्याठिकाणी मृत घोषित केले. त्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. चक्री पाळणाचालकाने खबरदारी घेत तात्काळ पाळणा थांबवला असता, अथवा तिला वैद्यकीय मदत उपलब्ध करुन दिली असती तर आपली मुलगी बचावली असती. तिच्या मृत्यूस पाळणा चालकाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप मुस्कानचे वडील मोहम्मद शमीम सिध्दीकी यांनी केला आहे.

पाळणा फिरत असताना पाळण्यात बसलेल्या मुस्कानचे डोके लोखंडी खांबावर आदळले. नंतर ती पाळण्यात अटकल्याने ती जखमी झाली. त्यानंतर पाळणा चालकाने तिला खाली उतरवून तेथून पलायन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी महेफुज अन्सारी व रुबिना या मुलांनी सांगितली आहे.

या दुर्घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेस पाळणाचालक जबाबदार असल्याची तक्रार मुस्कानच्या पालकांनी केली आहे. पोलिसांनी या दुर्घटनेची कसून चौकशी सुरू केली असून तपासाअंती पाळणाचालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कोकाटे यांनी दिली आहे.

दरम्यान, सणासुदीच्या दिवसात अशा पद्धतीने पाळणे, यांत्रिक पाळणे मोठ्या प्रमाणावर शहरात ठिकठिकाणी लागत असल्याने त्यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details