ठाणे New Variant of Covid 19 : ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जेएन वन या नवीन व्हेरिएंटचा रुग्ण दाखल झालाय. 19 वर्षीय तरुणीला मंगळवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर असून सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
ठाणे मनपा सतर्क : नवीन व्हेरिएंटचा पहिलाच रुग्ण ठाण्यात आढळला असून यामुळं ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झालीय. जेएन वन हा ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट केरळमध्ये आढळलाय. तीनशेहून अधिक जणांची आठवडाभरात केलेल्या तपासणीनंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत या व्हेरियंटचे 13 रुग्ण असून राज्यात हा आकडा 24 वर गेला आहे. ठाण्यातही या वेरियंट्सचा रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागलीय. ठाण्यात सध्या एकच रुग्ण आढळला असून पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येण्याची शक्यता आहे. या वृत्ताला कळवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र भारूड यांनीही दुजोरा दिलाय.
ठाण्यातील एका 19 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झालीय. या तरुणीवर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णाचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे इथं पाठविण्यात येणार आहेत. अहवालानंतरच कोणता व्हेरियंट आहे, याची माहिती समोर येईल. - डॉ. अनिरुद्ध माळगावकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी