नवी मुंबई (ठाणे) -आगामी 2021-22 या शैक्षणिक वर्षात किमान पहिल्या सहामाहीत शाळा प्रत्यक्ष वर्गात न भरवता ऑनलाइन शिक्षण पध्दत सुरू राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नवी मुंबई मनपा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनलिमिटेड नेट पॅकसाठी 1 हजार रूपये जमा करण्यात येणार आहे. नवी मुंबई मनपाचे आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना व आरोग्य सुविधांची काळजी घेतली जात आहे.
आर्थिक स्थितीमुळे अनलिमिटेड डाटा पॅक टाकणे पालकांना शक्य होत नाही -
मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून पुढाकार घेत आहे. मात्र, काही पालकांना आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून देण्याकरिता मोबाईलमध्ये आवश्यक असलेला नेटचा अनलिमिटेड डाटा पॅक टाकणे आर्थिक स्थितीमुळे शक्य होत नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा -वांद्र्यातील इमारतीचा काही भाग कोसळला; एकाचा मृत्यू तर पाच जखमी
मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांची करणार सोय -
महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता विद्यार्थ्यांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. 2021 - 22 या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सहामाही करिता नेटच्या अनलिमिटेड डाटा पॅकसाठी हे पैसे खात्यात जमा केले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे. तसेच ज्या मुलांच्या पालकांकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नही करण्यात येत आहे.