नवी मुंबई - कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये शनिवारी एकूण 5 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 4 कामोठे व 1 रुग्ण नवीन पनवेल भागातील असून पनवेल महानगरपालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 49 इतकी झाली आहे.
पनवेलमधील नवीन पाच कोरोनाबाधितांमध्ये पोलीस, पत्रकार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश - latest corona update panvel
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण 49 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. नवीन 5 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पोलीस, पत्रकार आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कामोठे येथील 53 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आली. ही व्यक्ती महाराष्ट्र पोलीस दलात काम करीत असून या व्यक्तीवर एम.जी.एम रुग्णालय, कामोठे येथे उपचार सुरू आहेत. ही व्यक्ती दररोज कामोठे ते सी.एस.टी. असा बसप्रवास करीत होती. या व्यक्तीला मुंबई येथे कामाच्या ठिकाणी अथवा प्रवासादरम्यान लागण झाल्याबाबत प्राथमिक अंदाज आहे. संबधित व्यक्तीला कर्करोगही झाला असून ते त्यावरही उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे कामोठे येथील 44 वर्षीय महिला कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आली असून ही महिला व्ही.एन.देसाई जनरल रुग्णालय, सांताक्रुझ येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत असून रुग्णालयातूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
या महिलेवर भाभा रुग्णालय, कुर्ला येथे उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे कामोठे सेक्टर-34 येथील 29 वर्षीय व्यक्ती कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती ट्रॉम्बे म्युनिसिपल डिसपेन्सरी, मुंबई येथे 'फार्मासिस्ट' म्हणून कार्यरत आहे. या व्यक्तीस मुंबई येथील कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या व्यक्तीवर उपजिल्हा रूग्णालय, पनवेल येथे उपचार सुरू आहेत. तसेच कामोठे सेक्टर 15 येथील 37 वर्षीय व्यक्ती कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती एका वृत्त वहिनीसाठी पत्रकार म्हणून काम करीत आहे. या व्यक्तीला मुंबई येथील कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. सध्या ही व्यक्ती फर्म हॉटेल, गोरेगाव, मुंबई येथे दिनांक 20 एप्रिलपासून विलगीकरण कक्षामध्ये आहे. नवीन पनवेल येथील 27 वर्षीय महिला कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. ही महिला सायन रुग्णालय, मुंबई येथे 'स्टाफ नर्स' म्हणून कार्यरत असून रुग्णालयातूनच त्या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या महिलेवर सेवन हील रुग्णालय, मुंबई येथे उपचार सुरू आहेत.