ठाणे- शहरात कोरोनाने थैमान घातले असून दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतच आहे. रविवारी नवी मुंबईत 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांना कोरोनाची बाधा होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
शहरात आत्तापर्यंत 325 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते . तर, 4 हजार 26 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 2 हजार 866 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 846 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 314 इतकी आहे.
रविवारी 307 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 282 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात कोपरखैरणे 5, नेरुळमधील 9, वाशीतील 9, ऐरोलीमधील 1 व तुर्भेमधील 1 असे एकूण 25 रुग्ण आहेत
नवी मुंबईत कोरोनाचे थैमान रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांत एपीएमसी बाजारातील व्यापारी, कर्मचारी व त्यांच्या संपर्कातील नातेवाईक, पोलीस, फार्मा कंपनीमधील कर्मचारी, डॉक्टर यांचा समावेश आहे. यात एपीएमसीमधील व्यापारी व कर्मचारी असे 5 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आत्तापर्यंत एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत 29 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आत्तापर्यंत एपीएमसीमधील व्यापारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून 34 निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. इतर कोरोना पॉझिटिव्ह आलेले अनेक रुग्ण हे मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत होते. नवी मुंबई महानगरपालिकेने मुंबईत सेवेसाठी जाणाऱ्या व्यक्तींना तिथेच राहण्याचे आवाहनदेखील केले आहे. कारण अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी व त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या व्यक्ती या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.