कल्याण-डोंबिवली (ठाणे) - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या नऊ दिवसात सतत शंभरच्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. शनिवारी सलग तिसऱ्या दिवशीही दिवसभरत २४३ रुग्ण आढळून आले असून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने आरोग्य विभाग यंत्रणासह संबंधित सर्वच यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून आले आहे.
गेल्या नऊ दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता महापालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळाले आहे. तर कोरोना रुग्णाचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात चाळ आणि वसाहतीमध्ये वाढल्याचे दिसून आले. कल्याण डोंबिवलीतील सलग सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवशी देखील कोरोनाच्या रुग्ण संख्येने २०० चा आकडा पार केला. शनिवारी २४ तासात तब्बल २४३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला असून १ हजार ३३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल १ हजार ८४८ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.