ठाणे :पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही कल्याण शीळ मार्गावरील पिसवली गावात आपल्या मोठ्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहते. पीडितेच्या बहिणीचे पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पीडिता घरी एकटीच असायची. ही संधी साधत शेजारी राहणाऱ्या सागर याने तिची छेड काढण्यास सुरूवात केली. महिनाभरापूर्वीच सागरने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र तिने आरडाओरड केल्याने तो तेथून पळून गेला. जाताना त्याने पीडितेला धमकवल्याने पीडिता भयभीत झाली होती.
नराधमाचे कुकृत्य :काही दिवसांनी नराधम सागरने तिला घरात एकटी पाहून पुन्हा तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच दिवशी वारंवार तिच्यावर बलात्कार केला. घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी पीडितेला दिल्याने ती घाबरली होती. त्यामुळे तिने याची वाच्यता कुठेच केली नाही. एक दिवस पीडिता घराबाहेर पडली असता आरोपीने भर रस्त्यात तिची छेड काढली होती. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने घडलेला प्रसंग आपल्या मोठ्या बहिणीला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या बहिणीच्या पतीने नराधम सागरला याचा जाब विचारला असता त्याने व त्याच्या कुटुंबाने त्यांची माफी मागितली. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा सागरने पीडितेच्या कुटुंबाला धमकावले.