ठाणे -घरगुती गॅससह, पेट्रोल, डिझेलचे दर गगणाला भिडले आहेत. याविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथे रविवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेच्या माहितीसंदर्भात लावण्यात आलेल्या एका फलकाखालीच राष्ट्रवादीच्या महिला शहाराध्यक्षा स्वाती कांबळे व जावेद फारुकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर गॅस दर वाढीचा निषेध म्हणून रिकामे सिलिंडर तिरडीवर ठेवत प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली. तसेच हातगाडीवर दुचाकी ठेवत यावेळी राष्ट्रवादीने पेट्रोल दरवाढीचा निषेध केला.