ठाणे- शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. कोरोना सेंटरमधील ८० टक्के बेड सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सीडकोच्या तिजोरीतील २३ कोटी रुपये खर्चकरून व्होल्टास कंपनीच्या जागेत नवीन कोविड सेंटर उभारण्याची तूर्त गरज नाही. व्यापक हित लक्षात घेता या कामाला स्थगिती देऊन कोट्यवधी रुपयांचा अपव्यय थांबवावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
कोरोना सेंटरमधील ८० टक्के बेड रिक्त -
ठाणे शहरात कोरोना रुग्णांसाठी सर्वसाधारण श्रेणीतील (जनरल वॉर्ड) ४ हजार ३८३ बेड उपलब्ध आहेत. २९ ऑक्टोबरला त्यापैकी फक्त ८६१ बेडवर रुग्ण उपचार घेत होते. ३ हजार ५२३ बेड म्हणजेच ८० टक्के बेड रिकामे होते. १ हजार ७८० बेडवर ऑक्सिजनची सुविधाही आहे. त्यापैकी १ हजार ५०५ म्हणजेच ८५ टक्के बेडवर रुग्णच नव्हते. आयसीयू बेडची संख्या ४६८ असून तिथे २४३ रुग्ण उपचार घेत होते. अत्यवस्थ रुग्णांसाठी १९३ बेड आहेत. मात्र, आता गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाल्याने ५५ टक्के म्हणजेच १०६ बेडवर रुग्णच नव्हते. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी सज्ज असलेल्या केंद्रांमध्ये ८० टक्के बेडवर जर रुग्णच नसतील तर २३ कोटी रुपये खर्चकरून नव्या कोविड सेंटर उभारण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना आणि महानगरपालिका प्रशासनाने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.