ठाणे :मीरा-भाईंदर शहरात एकेकाळी नंबर वन असलेल्या पक्षाचा आज एकही नगरसेवक नाही. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत चित्र नक्कीच वेगळे असले, अशा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मीरा-भाईंदरमध्ये पक्षाची आढावा बैठक घेतली होती. त्यापाठोपाठ महिला वर्गाला आकर्षित करण्यासाठी महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शहरातील अनेक ठिकाणी महिलांचे छोटे मेळावे घेत महिलांशी संपर्क साधला. येणाऱ्या पुढील आठ दिवसांत नवीन महिला जिल्हाध्यक्षची निवड केली जाईल आणि पुन्हा त्याचं ताकदीने पक्ष उभा करू असेही चाकणकर म्हणाल्या.
मीरा-भाईंदरमधील महिला आढावा बैठकीत बोलताना रुपाली चाकणकर दिग्गज येणार स्वगृही?
मीरा-भाईंदर शहरातील राष्ट्रवादीचे दिग्गज पक्ष सोडून भाजपा आणि सेनेच्या गोटात सामील झाले. आता हेच नेते पुन्हा स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेट, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. २५ वर्ष ज्यांनी राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला सांभाळला त्या माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. आता ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. माजी जिल्हा अध्यक्ष मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम देखील राष्ट्रवादी पक्षात दाखल झाले आहेत.
जिल्हाध्यक्ष पदासाठी चढाओढ -
राष्ट्रवादी काँग्रेसने मीरा-भाईंदरमध्ये २५ वर्षा सत्ता केली आहे. मात्र, भाजपाच्या लाटेमध्ये अनेक दिग्गजांनी भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश केला. आता तेच पुन्हा पक्षात सामील झाले आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष म्हणून संतोष पेंडुरकर काम पाहत आहेत. मात्र, त्यांना समाधानकारकपणे पक्षबांधणी करता आलेली नाही. खुद्द मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर सभेत याबाबत व्यक्तव्य केले होते. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हाध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे जाणार, हे सांगणे आता अवघड आहे. मात्र, माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, अंकुश मालुसरे, असिफ शेख हे जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याची माहिती मिळत आहे.