महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NCP Protest : राष्ट्रवादीने केली पन्नास खोक्यांची होळी ; जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'गद्दारी करणारे..' - राष्ट्रवादीचे आंदोलन

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात पन्नास खोक्यांची होळी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

NCP Protest
राष्ट्रवादीचे आंदोलन

By

Published : Jun 20, 2023, 5:17 PM IST

ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात पन्नास खोक्यांची होळी करीत 'गद्दार दिन' साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर आनंद परांजपे यांना पोलिसांनी अटक केली.

आनंद परांजपे यांना अटक करून सुटका : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या बंडानंतरच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे गट व भाजप युतीचे सरकार राज्यात स्थापन झाले. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, 'खाऊन खाऊन माजलेत बोके, पन्नास खोके- पन्नास खोके', 'महाराष्ट्र त्रस्त, खोकेवाले मस्त' अशा घोषणा दिल्या. तसेच, 'पन्नास खोके' असे लिहिलेले खोकेही यावेळी जाळण्यात आले. या आंदोलनात सहभागी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई - सुरत - गुवाहाटी असे लिहिलेला टी शर्ट परिधान केला होता. आंदोलनानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आनंद परांजपे यांना अटक करून सोडून दिले.

'जनता मतपेटीतून धडा शिकवणार' :या वेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटातील आमदारांची तुलना सूर्याजी पिसाळ यांच्याशी केली. ते म्हणाले की, वर्षभरापूर्वी सुर्याजी पिसाळांच्या औलादींनी महाराष्ट्राशी गद्दारी करून सुरतेकडे प्रयाण केले होते. त्याचा निषेध म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले आहे. पन्नास खोक्यात स्वत:ला विकणाऱ्यांचे चारित्र्य काय असेल हे सांगायलाच नको. पण, हे पन्नास खोके किती पुरणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना मतपेटीतून धडा शिकवणारच आहे'.

'सर्व सर्व्हे मॅनेज आहेत' : ते पुढे बोलताना म्हणाले की, 'आता जे काही सर्व्हे येत आहेत, ते सर्व मॅनेज आहेत. शिंदे सरकार आणि भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही. गेल्या वर्षभरात महिलांना मारहाण करण्याची संस्कृती महाराष्ट्रात वाढीस लागली आहे. रोशनी शिंदे आणि अयोध्या पौळ ही त्याची उदाहरणे आहेत. गेले वर्षभर दादागिरी करणे, खोट्या केसेस टाकणे असेच प्रकार या लोकांनी केले आहेत. त्यावरून पन्नास खोक्यावाले मनातून किती क्रूर आहेत, हे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.

हेही वाचा :

  1. Maharashtra Politics : मुंबई ते गुवाहाटी व्हाया सुरत, शिंदेंच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण! जाणून घ्या A टू Z
  2. Kolhapur News : कोल्हापुरात जागतिक 50 खोके दिन साजरा; प्रतिकात्मक पद्धतीने रचले पन्नास खोके

ABOUT THE AUTHOR

...view details