ठाणे - शहापूर विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा पालकमंत्र्यांच्या उपस्थित दिला. ते आपल्या शेकडो समर्थकांसह शिवबंधनात अडकणार आहेत. बुधवारी आमदार बरोरा हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात पक्ष प्रवेश करणार आहेत.
शहापूरातील राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा; उद्या अडकणार शिवबंधनात पांडुरंग बरोरा यांनी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी 50% राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सेनेत प्रवेश करणार असल्याचे चित्र दिसत आहे. पांडुरंग बरोरा यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढणार असून तालुक्यात विकास कामांचा पाऊस पडणार असल्याचा त्यांच्या समर्थकांनी दावा केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.
आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासोबत शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे चार सदस्य, पंचायत समिती सदस्य, 42 सहकारी संस्था, 47 सरपंच उपसरपंचासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे चार संचालक आणि तालुक्यातील हजारो राष्ट्रवादी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने तालुक्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडणार आहे.
याबाबत शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की तालुक्यातील विकासासाठी मला सातत्याने पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार्य केले. माझ्या ड्रीम प्रोजेक्ट भावली पाणीपुरवठा योजनेला देखील 200 कोटी रुपयांचा निधी देऊन तत्काळ युती सरकारने मंजूर दिली आहे. क्रीडा संकुल प्रशासकीय इमारत व स्थानात व एमआयडीसी यासाठी देखील मला सहकार्य केले आहे. मतदार संघातील विकास कामांसाठीच मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.