ठाण्यात वाहतूक कोंडी- विनय राठोड पोलीस उपायुक्त ठाणे ठाणे :राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाण्याच्या विकासासाठी भरगोस निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणला गेला. यामध्ये केवळ रस्त्यांच्या कामांसाठीच पहिल्या टप्प्यात २१४ कोटी तर दुसऱ्या टप्प्यात ३९१ कोटींचा निधी राज्य शासनाने ठाणे महापालिकेला दिला आहे. एवढा भरगोस निधी मिळाल्यानंतर पालिका प्रशासनानेही एकाच वेळ रस्त्यांची कामे सुरु केली आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. यामधून मार्ग काढताना वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठाण्यात असा कोणता रस्ता शिल्लक राहिलेला नाही, जिथे वाहतूक कोंडी होत नाही. परिणामी १० मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल एक तास लागत आहे. ही रोजचीच डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीचे करायचे काय? असा प्रश्न ठाणेकरांना पडला आहे.
खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते :या वाहतूक कोंडीच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले, तसेच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर आज माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाचे वाभाडे काढले आहेत.
एकाच वेळेस अनेक रस्त्यांची कामे :कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता एकाच वेळेस शहरातील अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. त्याचा फटका सबंध ठाणे शहराला बसला आहे. वाहतूक कोंडीची तीव्रता अधिकाधिक वाढू लागली आहे, अशा आशयाचे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. संपूर्ण ठाण्यात रस्त्यांची कामे चालू आहेत. जागोजागी खड्डे पाडून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवले आहेत. याचे काही नियोजन दिसून येत नाही. हजारो कोटींचे रस्ते होत आहेत.
पावसाळ्यात काम बंद :1 जून ते 1 ऑक्टोबर कामे करता येत नाहीत. तसा शासकीय नियम आहे. ही कामे जरी केली तरी त्याचा दर्जा कसा असेल, असा प्रश्न उपस्थित करून, हे हजारो कोटी जे ठाण्याच्या विकासासाठी आणले आहेत ते पाण्यात वाहून गेले हे मनाला न पटणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर वाहतूक विभाग देखील कामाला लागले असून पर्यायी मार्गांवर २४ तास माणसे नेमण्याचे नियोजन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. दुसरीकडे साकेत, खारेगाव आणि मुंब्रा बायपास या ठिकाणी दरवर्षी खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते ती कोंडीही यावेळी होणार नसल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला आहे. या वाहतूक कोंडीवरून एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत असले तरी ठाणेकरांची या वाहतूककोंडीतून मुक्तता कधी होणार ? असा प्रश्न सध्या ठाणेकरांना पडला आहे.
हेही वाचा : Navi Mumbai Traffic : खुशखबर! नवी मुंबईची वाहतूक कोंडी सूटणार