ठाणे - ढासळलेली रुग्णव्यवस्था बळकट करण्याची गरज असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. कर्करोगाच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रातच नाही तर देशात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कर्करोग असणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयाची गरज असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
शहापूर तालुक्यातील दोऱ्याचापाडा येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालय व शैक्षणिक संकुलचे भूमिपूजन सोहळा शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र अव्हाड, आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे, दौलत दरोडा, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
हा जाणता राजा नाही तर मग कोण, आव्हाडांचा टोला
शरद पवारांना मी जाणता राजा बोललो, त्यावेळी विरोधकांनी माझ्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. तेव्हा मी त्यांना संगितले, छत्रपती एकच होऊ शकतात, शिवाजी महाराज एकच होऊ शकतात. पण जाणता राजा कोण? जो आदिवासींची दुःख जाणतो, जिल्ह्यात एमआयडीसी देतो, आदिवासी समाजाचा नाच आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करणारा हा जाणता राजा नाही तर मग कोण असे बोलत मंत्री जितेंद्र आव्हाडांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली.