ठाणे- राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षण देण्याच्या मुद्दयावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आजही मुस्लिम समाजाच्या आरक्षणाविषयी नवाब मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधत, भाजपाला भांडण लावल्याशिवाय राजकारण करता येत नसल्याची टीका केली.
नवाब मलिक, अल्पसंख्याक विकासमंत्री मलिक भिवंडीत बीएनएन महाविद्यालय संचालित कौशल्य विकास केंद्रामार्फत आयोजित रोजगार मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी नवाब मलिक पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने उच्च नायलायने मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण मान्य केल्यानंतरही कायदेशीर सल्ला घेतो, मार्गदर्शन घेतो, असे सांगत मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय त्यांच्या सरकारच्या काळात पुढे ढकलत नेण्याचे काम केले. पण, आम्ही उच्च न्यायालयाने मान्य केलेले मुस्लिम आरक्षणा कायदेशीर बाबी पूर्ण करूनच आरक्षणाचा कायदा लागू करू असे मलिक यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस व भाजप कंपनीस भांडण लावल्याशिवाय राजकारण करत येत नाही. म्हणून हे भाजपवाले विविध समाजात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत, असाही टोला त्यांनी लगावला.
एससी, एसटी, ओबीसी, मराठा या समाजाच्या आरक्षणांना कोणत्याही प्रकारे धक्का न लावता मुस्लिम आरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचीही माहिती नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.